मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. पक्षाचं चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. अयोध्यामधील साधू सतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण देऊन त्यांचं अयोध्यानगरीत भव्य असं स्वागत केलं. लक्ष्मण किल्ल्याच्या महंतांनी यावेळी बोलताना म्हटलं की, दसऱ्याच्या दिवशी एकनाथ शिंदे यांना आम्ही आशीर्वाद म्हणून धनुष्यबाण दिला होता. आता त्यांना अधिकृतरित्या पक्षाचं चिन्ह मिळालं आहे. आज आम्ही पुन्हा एकदा आशीर्वाद म्हणून त्यांना धनुष्यबाण दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत वातावरण भगवामय झालं आहे आज मुंबई, ठाणे आणि नाशिकहून ट्रेनने साकाळीच शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले. या शिवसैनिकांचं स्वागत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के भल्या पहाटेच अयोध्येच्या रेल्वे स्थानकावर पोहोचले होते.