अकोला जिल्ह्यातील पारस गावात मंदिरावर लिबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली. रविवारी रात्री 9च्या सुमाराला मंदिरात 50 ते 60 भाविक होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होते. बहुधा या वाऱ्यामुळेच लिंबाचं मोठं झाड शेडवर कोसळलं. पाऊस रात्रभर सुरू असल्यानं मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मदतकार्य सुरू होतं.अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातलं पारस काल (रविवारी) संध्याकाळी चांगलंच हादरलं. गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातून भाविकांची मोठी गर्दी असते. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मंदिरात आरती झाली. आरतीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे बाहेर असलेल्या भाविकांनी मंदिरात असलेल्या टिनाच्या शेडवर सहारा घेतला. अन् नेमकं याचवेळी वाऱ्यामुळे मंदिरासमोर असलेलं लिंबाचं झाड शेडवर कोसळलं.