Maharashtra : आदित्य ठाकरेंनी दावा केला की,४० आमदार अपात्र होतील आणि राज्यात मध्यावती निवडणुका लागतील.
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल”; आदित्य ठाकरेंना विश्वास
आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या असून, मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. यातच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
४० आमदार अपात्र होतील. पोटनिवडणूक लागेल किंवा मध्यवती निवडणुका लागतील. मग महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते. पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच गुलाबराव पाटील यांच्या विधानाकडे लक्ष देऊ नका, असे सांगत मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
‘जातीजातीत आणि धर्माधर्मात वाद निर्माण करायचा प्रयत्न’,शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मी आधीच सांगितले आहे, प्रत्येक सभेत सांगत आलो आहे. की त्यांचा पुढचा प्रयत्न हा जातीजातीत आणि धर्माधर्मात वाद निर्माण करायचा. याकडे कुणीही लक्ष देऊ नका. महाराष्ट्र म्हणून आपण अंधारात चाललो आहोत, महाराष्ट्रात कृषी केंद्र आणि उद्योग क्षेत्र कोलमडत चालले आहे. गुलाबराव पाटील यांचे पाईपलाइनचे विषय आमच्याकडे आले आहेत. ते मी अधिवेशनात बोलणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.