महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यामागेही पवारच. मात्र महाविकास आघाडीबद्दल शरद पवारांच्या एका विधानानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. जागावाटप अजून निश्चित झालं नसल्यामुळे आघाडीबाबत आताच काही सांगता येत नाही असं विधान पवारांनी केल्यानं पुन्हा चर्चांना उधाण आलं. अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चा थांबत नाहीत तोवर पवारांचं मविआबद्दल मोठं विधान आलं. साहजिकच त्याचे राजकीय पडसाद उमटले. पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय…तर पवार ठाकरेंना कंटाळून विधान करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांनी एक विधान केलं. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. 2024 मध्ये महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.