ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. येत्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून किमान 20 लाख श्रीसदस्य उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी,सिडको अधिकारी,पनवेल , नवी मुंबई मनपा अधिकारी ,रायगड आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी असे शेकडो अधिकारी या सोहळ्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. श्री सदस्य देखील श्रमदान करून सोहळ्याची तयारी करत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत हे वैयक्तिकरित्या सोहळ्यातील नियोजनाचा आढावा घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर सोहळ्याच्या जागेवर येवून अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत निर्देश दिले आहेत. खारघर परिसर चकाचक करण्यात आला आहे. सर्व मोकळ्या भूखंडांची सफाई रस्त्यांची डागडुजी नवीन रस्त्यांची निर्मिती अवघ्या 5 दिवसात करण्यात आली आहे. खारघर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. रविवारी सोहळ्याच्या दिवशी अंतर्गत रस्त्यांवरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवून पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी शनिवारीच खारघर परिसरात दाखल होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई आणि पनवेल मधील सर्व शाळा शनिवारी ठेवण्याचे निर्देश पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख आणि नवी मुंबई शिक्षण उपायुक्त योगेश कडूस्कर यांनी दिले आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन असतील म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय सोहळ्यासाठी संभाव्य गर्दी लक्षात घेवून प्रथमच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे