भारतातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या एमेरिटस चेअरमन केशब महिंद्रा यांचं आज निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी त्यांच्या पश्चात 1.2 अब्ज डॉलर म्हणजे 98 अब्ज रुपयांची संपत्ती सोडली आहे. त्यांच्या निधनाने उद्योगजगतातून हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल चार दशके महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचं नेतृत्व केले. त्यांनी अनेक सरकारी समित्यांवर कामही पाहिले. उद्योग जगतात दिलेल्या प्रचंड योगदानाबद्दल केशब महिंद्रा यांना 2007मध्ये अर्न्स्ट अँड यंगकडून लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला. 1987मध्ये त्यांना फ्रान्स सरकारने शेवेलियर डी ल’ऑर्ड्रे नेशनल डे ला लीजन डी’होनूर पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.दिवंगत केशब महिंद्रा यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1923 रोजी झाला. केशब महिंद्रा यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी 1947 मध्ये त्यांच्या वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 1963मध्ये त्यांना महिंद्रा ग्रुपचे चेअरमन बनवण्यात आले होते. कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कंपनीला यशोशिखरावर नेले. त्यांनी आपल्या कार्यकाळात युटिलिटीशी संबंधित वाहन निर्मितीसाठी भर दिला. विलीज जीपला वेगळी ओळख देण्याचं काम केशब महिंद्रा यांनी केले.