नाशिक प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर(नासिक) येथे दर्शन घेऊन गुजरातकडे जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. त्यामध्ये 30 हून अधिक प्रवासी हे जखमी असून त्यातील दहा जणांची परिस्थिती गंभीर आहे. नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात ( Nashik Civil Hospital ) त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यामध्ये गुजरातवरुन महाराष्ट्रातील देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी काही भाविक बस करून आले होते. तीन बस या गुजरातवरुन महाराष्ट्रात आलेल्या होत्या. देवदर्शन झाल्यावर त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन हरसुल मार्गे गुजरातची वाट धरली होती.गुजरातच्या दिशेने जात असतांना हरसुल येथील घाटात बसवरील चालकांचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. रस्त्यावरून बस उलटली आणि मोठा अपघात झाला आहे. सोबत असलेल्या बस देखील लागलीच थांबविण्यात आल्या.इतर बसमधील नागरिकांनी उतरून लागलीच मदत सुरू केली. बसच्या काचा फोडून प्रवाशांना त्यातून बाहेर काढण्यात आले. अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हाणी झाली नसली तरी 30 हून अधिक प्रवासी जखमी आहे.अपघात झालेल्या बसमध्ये असलेले प्रवासी हे गुजरात मधील कच्छ येथील होते. अपघात झालेल्या बसमध्ये 57 भाविक प्रवास करीत होते. गुजरातला जात असतांना हरसुल बारीत हा अपघात झाला आहे.प्रथम दर्शनी चालकाचे वेगावर नियंत्रण सुटल्याने आणि अचानक वळण आल्याने बस नियंत्रित न करता आल्याने हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आणि मिळेल त्या वाहनांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी जे रुग्ण गंभीर जखमी आहे त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.खरपडी घाटात ही बस उलटली असल्याने मदत मिळण्यास उशीर झाला होता. याशिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताच्या दरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी सुरुवातीला मदत केली होती.ग्रामीण भागात हा अपघात झाल्यानंतर खाजगी डॉक्टर आणि सामाजिक संस्थानच्या माध्यमातून यावेळी मदत करण्यात आली होती. इतर दोन्ही बसही रात्री उशिरा पर्यन्त मदतीसाठी थांबून होत्या.गुजरात ते महाराष्ट्र सीमेवर किंवा आदिवासी भागात अपघात झाल्यानंतर सुरुवातीला मदत मिळण्यास मोठी अडचण निर्माण होते. अपघात झालेल्या ठिकाणी मोबाईल रेंज नसल्याने संपर्क करण्या स अडचण निर्माण होत होती.