महाराष्ट्र सरकारच्या अभ्यासक्रमाच्या शाळा वगळता राज्यातील इतर शाळा, परीक्षा अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून 3 वर्षांकरिता स्थगिती देण्यात आल्याची बातमी काल समोर आलेली. विशेष म्हणजे याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतर महत्त्वाचे नेतेही यावेळी सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित होते. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यापैकी राज ठाकरेंनी मराठी भाषा CBSE, ICSE, केम्ब्रिजच्या शाळांमध्ये सक्तीचा निर्णय स्थगित झाल्याच्या मुद्दाही उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं.मराठी शाळांच्या संदर्भात जो विषय आलाय, अधिकाऱ्यांनाही या आदेशाबद्दल माहिती नव्हतं. तो आदेश कुणी पाठवलाय ते माहिती नाही. पण मराठी विषय बंद होणार नाही. कोणत्याही शाळेत मराठी विषय बंद होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री याबाबत पाहतील, नक्की नेमकं काय झालंय ते त्याप्रमाणे निर्णय घेतील. या आदेशाबाबत अधिकाऱ्यांनाच माहिती नव्हतं. म्हणून मलापण ते कळत नव्हतं. त्यांनाही जीआरबद्दल माहिती नव्हती. तसं होणार नाही”, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.