उन्हाळ्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर असताना अकलूज – टेंभूर्णी मार्गावरील संगम येथील उजनी उजवा कॅनॉल शुक्रवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान फुटला. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. जवळपास २१ तास उलटूनही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी कल्याणराव माने -देशमुख फोन उचलत नाहीत. अद्याप एकही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावेत. तसेच कॅनॉलची तत्काळ गळती रोखावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याअभावी पिके होरपळून चालली आहेत. परंतु, अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. उजनी उजवा कालव्याचे पाणी माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्याला शेतीसाठी आणि पिण्यासाठी जाते. माळशिरस तालुक्यातील संगम या ठिकाणी हा कॅनल फुटल्याने मंगळवेढ्याला पाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे तत्काळ कॅनल दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली