‘मी आले, पाहिले, उचलेल अन् निघाले’; छत्रपती संभाजीनगरच्या सौंदर्याची ऐशी तैशी
छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरातील मुख्य रस्ते नयनरम्य करण्यात आले. सौंदर्यीकरणासाठी विमानतळ, दुभाजक, ऐतिहासिक दरवाजे, क्रांती चौक आदी भागात महापालिकेने ३ हजारांहून अधिक शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. विदेशी पाहुणे जाताच या कुंड्या गायब होण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी शंभराहून अधिक कुंड्या नसल्याचे निदर्शनास आले. शनिवारी मनपाच्या उद्यान विभागाकडून कुंड्यांची मोजणी केली जाणार असल्याचे मुख्य अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.
कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिका आणि विविध शासकीय कार्यालयांनी शहराचा चेहरामोहरा बदलला. ही सुंदरता नागरिकांनी टिकवून ठेवावी, विद्रूपीकरण करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात आले. त्यानंतरही मनपाला जी भीती होती तेच सध्या होत आहे. मागील दोन दिवसांत विमानतळ, क्रांती चौक, जालना रोड, हॉटेल ताज, बारापुल्ला गेट, क्रांती चौक आदी भागातील शोभिवंत झाडांच्या मोठ्या कुंड्या गायब आहेत. दुभाजकांमध्ये लावलेली फुलांची झाडेही नागरिक उपटून नेत असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून शनिवारी प्रशासन गायब कुंड्यांची मोजणी करणार आहे.
हॉटेल ताजसमोरील कुंड्या गायब
हॉटेल ताजसमोर मनपाने अनेक सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. हे फुले पाहून एका महिलेने थेट कुंड्या उचलून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
शोभिवंत झाडांच्या शंभराहून अधिक कुंड्या, दिवे गायब; मनपा आज करणार मोजणी
Published: