देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. केंद्रात भाजपचा पराभव करायचा असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येणं जास्त गरजेचं आहे, अशी भावना विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालीय. त्यासाठी दिल्लीत काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेले होते. तसेच राहुल गांधी देखील या बैठकीत होते. सर्वच विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम आता सुरु झालं आहे. असं असताना राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत वारंवार मतभेद आणि नाराजीनाट्य समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नागपुरातील वज्रमूठ सभेवरुन नाराजी नाट्य सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या गोटात हे नाराजीनाट्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या पहिल्या वज्रमूठ सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गैरहजर राहिले होते. असं असताना आता काँग्रेसची जिथे ताकद आहे तिथे महाविकास आघाडीची सभा असताना काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे