माजी आमदार अमल महाडिक यांनी दिलेलं चॅलेंज आमदार सतेज पाटील यांच्या गटाने स्वीकारल्याने कोल्हापुरातील घडामोडींना वेग आला आहे. अमल महाडिक यांनी बिंदू चौकात येऊन समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान सतेज पाटील यांना दिलं होतं. या चर्चेसाठी महाडिंकांनी आज संध्याकाळी साडेसात वाजेची वेळ दिली होती. त्यांचं हे आव्हान सतेज पाटील यांनी स्वीकारलं. त्यामुळे आता पाटील गटही बिंदू चौकात दाखल होणार हे निश्चित झालं. दोन्ही गट बिंदू चौकात जमले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आधीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता पोलीस कसं हाताळतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिंदू चौकात सध्याच्या घडीला मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये यासाठी तयारी केली आहे. पोलीस वाद मिटवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही गटांना बिंदू चौकावर येऊच देणार नाही. या दोन्ही गटांना बिंदू चौकापासून काही अंतरावर अडवलं जाणार आहे. पण तरीही बिंदू चौकात एक फलंक लागलं आहे. ‘आमदार सतेज पाटील यांचं एकदा ठरलं की ठरलं’, अशा आशयाचा फलक बिंदू चौकात लागला आहे.