अमरावती : शहर आयुक्तालयातील सायबर पोलिसांना सायबर चोरांची आंतरराज्यीय टोळी गजाआड करण्यात यश आले आहे. सायबर गुन्ह्यांचे पॉवर स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झारखंडमधील जामताडा येथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. अभिषेक अब्राहम पुर्ती (१९, रा. गोराटोली, जिल्हा: खुंटी, झारखंड) व अमरेज शिवशंकर उराव (१९, रा. लोहारा जि. गुमला, झारखंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सायबर पोलीस ठाण्याने शुक्रवारी यशस्वी कारवाई केली.
सामान्य लोकांच्या ऑनलाईन फसवणुकीकरीता आरोपींनी १६ सिम व १५ वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईलचा व सहा बँक खात्यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. येथील प्रितिश हटवार यांनी ॲमेझॉनवरून नळाची मागणी केली होती. मात्र काही नळ कमी आल्याने त्यांनी कस्टमर केअरला संपर्क साधला. पुढे क्विक सपोर्ट व कस्टमर सपोर्ट असे दोन ॲपडाऊनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून ८ लाख ६१ हजार ७७५ रुपये परस्परच कपात झाले होते.
९ जानेवारी रोजी गुन्हा याप्रकरणी दाखल करण्यात आला. गुन्हयांच्या तपासा दरम्यान यातील आरोपी हे झारखंड येथील जामताडा परिसरातील असल्याचे माहिती झाले. त्यावरून सायबरचे सहायक पोलीस निरिक्षक महेन्द्र इंगळे, सपोउपनि चैतन्य रोकडे, शैलेन्द्र अर्डक, उल्हास टवलारे यांचे पथक झारखंडला गेले. ते आरोपी हे धनबाद, देवघर, सारट, जामताडा, रांची अशा वेगवेगळ्या परिसरामध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. तब्बल पाच दिवसानंतर जामताडा येथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.