आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचे धक्कादायक विधान केले होतेआम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे एक ट्विट केले होते. याची आज राज्यभर चांगलीच चर्चा झाली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे यांनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे काँग्रेसकडून आपली भूमिका मांडण्यात अली असून स्वतः अजित पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली.आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी ट्विट केले होते की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तेव्हा तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे, लवकरच १५ आमदार बाद होणार असून अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. आता बघू, आणखी किती दुर्दशा होते महाराष्ट्राच्या राजकारणाची.” असे ट्विट केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावर स्वतः अजित पवार म्हणाले की, “इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार?” असे म्हणत टोला लगावला.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अंजलीताईंना अजूनतरी या देशात स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मी काही त्यांचे ट्विट वाचले नाही. पण त्यांचा तो अधिकार आहे.” असे म्हणत त्यांना पुन्हा एकदा ‘अजित पवार भाजपसोबत जाणार का?’ असे विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की, “आता सध्या मुळशीमध्ये उन्ह आहे, पण १५ मिनिटांनंतर इथे मुळशीमध्ये पाऊस पडेल का? याचे उत्तर माझ्याकडे नाही,” अशा मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, “अजित पवार यांची बदनामी करण्यासाठी अंजली दमानिया यांनी भाजपपुरस्कृत ट्विट केले आहे,” असा आरोप केला.