आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी मुंबईत येणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकित अमित शहा मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण काय आहे, यासोबतच मुंबई महानगर पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत भाजपची काय स्थिती आहे याचा आढावा देखील अमित शहा या बैठकीत घेणार आहेत. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथे उद्या हा पुरस्काळ सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान या पुरस्कार सोहळ्याच्या तयारीची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या कार्यक्रमासाठी 15 ते 20 लाख समर्थक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या रात्री 12 पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक बंद असणार आहे. तर हार्बर रेल्वेमार्गावरील मेगा ब्लॉकदेखील रद्द करण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत येत असताना त्यांच्या अगदी जवळचे असणारे मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असल्यानं चर्चांना उधाण आले आहे